Bridge Tendernama
मुंबई

Mumbai : अंधेरी पुलाच्या दुरुस्तीसाठी 92 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्यावतीने पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी पूर्व येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 'फ्रेस्सिनेट प्रीस्टेरेस्ट कॉंक्रीट कंपनी लिमिटेड'ला हे काम मिळाले आहे. येत्या बारा महिन्यांत या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व येथील गुंदवली रस्ते पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात होता. त्यानंतर तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आला आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून या पुलाची देखभाल केली जात होती. डिसेंबर २०२२ मध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएकडून मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. अंधेरी येथील हा पूल युती सरकारच्या काळात बांधण्यात आला होता. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधण्यात आलेला हा पहिला पूल असून ज्यामध्ये पुलाच्या खालील बाजूस शॉपिंग सेंटरची संकल्पना होती. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा या मार्गावरील मोठा पूल जोग कंपनीने बांधल्यानंतर त्यांना शॉपिंग सेंटरची संकल्पना पूर्णत्वास नेता आली नाही. त्यामुळे हे पूल केवळ वाहतुकीसाठीच सुरु झाले.

मात्र, या पुलाचा ताबा जोग कंपनीकडे असल्याने त्यांनी ते महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरीत करणे आवश्यक होते. परंतु पुलाची देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून आधी एमएसआरडीसीने या पुलाच्या देखभालीची जबाबदारी घेतली, त्यानंतर पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीच्या ताब्यात दिल्यामुळे या पुलाची जबाबदारी त्यांच्याकडे एमएसआरडीसीने सुपूर्द केली. पुन्हा हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत करताना या पुलाची जबाबदारीही महापालिकेकडे आली. मात्र, पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएने महापालिकेकडे हस्तांतरीत केला असला तरी या अंधेरी पूर्व येथील पुलाच्या हस्तांतरणाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसतानाही महापालिकेने या पुलाच्या डागडुजी तथा दुरुस्तीच्या कामांसाठी टेंडर मागवून कंत्राटदाराची निवड केली आहे. या द्रुतगती महामार्गावरील पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग व स्कायवॉक हस्तांतरण केल्यानंतर या पुलाचे संरचनात्मक आराखडे व डिझाईन इत्यादी एमएमआरडीएकडून महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या अंधेरी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट मार्च २०२३मध्ये व्हीजेटीआय मार्फत करण्यात आले.