bmc Tendernama
मुंबई

दक्षिण मुंबईतील रस्ते होणार चकाचक; 9 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने दुरुस्ती-डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये खचलेले रस्ते दुरुस्ती, खड्डे-चर भरणे, साईडपट्टी दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील ५ विभागांच्या कामासाठी महापालिका ९ कोटींचा खर्च करणार आहे. 'ए. के. कॉर्पोरेशन' या कंत्राटदाराने अंदाजित खर्चापेक्षाही 23.40 टक्के कमी खर्चात हे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी आणि काम केल्यावर फोटो काढून ते पुरावे म्हणून सादर करणे बंधनकारक आहे.

जमिनीखालील जलवाहिनी फुटल्याने जमीन, रस्ता खचतो. कधी कधी पर्जन्य जलवाहिन्यांच्या ठिकाणी गटार, नाल्यांची भिंत कोसळते, तर कधी रस्त्यावरील, पदपथावरील ढापे तुटतात. अशा घटना यापूर्वी काळबादेवी, वांद्रे आदी ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे महापालिका खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करीत आहे. महापालिकेच्या 'ए', 'बी', 'सी', 'डी', 'ई' या पाच वार्डांत म्हणजे सी.एस.एम.टी., चर्चगेट, कुलाबा, मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, ग्रँट रोड, भायखळा आदी भागात पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते, चौक आदी पाच ठिकाणी काम करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टेंडर मागवली होती. त्याला पाच देकार प्राप्त झाले आहेत.

महापालिकेने या पाच वार्डांमधील कामांसाठी अंदाजित खर्च आठ कोटी ठरविला होता. त्यास प्रतिसाद देताना पाचपैकी 'ए. के. कॉर्पोरेशन' या कंत्राटदाराने अंदाजित खर्चापेक्षाही 23.40 टक्के कमी खर्चात काम करण्याची तयारी दर्शवली. कर आणि इतर आकार लक्षात घेता हा खर्च नऊ कोटींवर जात आहे.