मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यापूर्व पडणारे खड्डे भरण्यासाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्रपणे ८४ कोटींचा निधी नुकताच वितरीत केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसाठी प्रति चौरस मीटर ४ हजार रुपये इतका खर्च केला जाणार आहे. यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरच्या कामाची वैधता फक्त ४५ दिवसांची आहे. त्यामुळे १५ जूनपूर्वी येत्या ३० दिवसांच्या आत कामे पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे उद्धिष्ट आहे.
मान्सूनपूर्व रस्त्यांच्या खराब पॅचच्या कामांसाठी मुंबईतील प्रत्येक प्रभागाला निधीचे वाटप करण्यात आले आहे. या निधीचा वापर विभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी करायचा आहे. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी खराब पॅचेस ओळखावेत आणि रोड सेंट्रल एजन्सीच्या कार्यकारी अभियंत्यांना नियुक्त एजन्सीद्वारे ते पूर्ण करण्यास सांगावे असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईत एकूण सहा परिमंडळ आहेत. या सहा परिमंडळामध्ये ८४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परिमंडळ १ - १५ कोटी, परिमंडळ २ - १२ कोटी, परिमंडळ ३ - ९ कोटी , परिमंडळ ४ - १५ कोटी, परिमंडळ ५ - १५ कोटी आणि परिमंडळ ६ - ९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. के पश्चिम वॉर्डला सर्वाधिक ६.५ कोटी तर एच पूर्व, के पूर्व, एन आणि एस वॉर्डला सर्वाधिक कमी २.५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वाटप केलेल्या निधीचे प्रमाण हे प्रभाग कार्यालयांच्या मागणीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खर्च करू नका आणि जर जास्त प्रमाणात आवश्यक असेल तर फाईलमध्ये पूर्व मंजुरी घ्या असे निर्देश ही देण्यात आले आहेत.
निधी वाटपामध्ये पश्चिम उपनगराला सर्वाधिक ३९ कोटी, त्याखालोखाल शहर २७ कोटी तर पूर्व उपनगराला १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून मुंबईतील एकूण २,१०,००० चौ.मी. क्षेत्रफळातील खड्डे भरले जाणार आहेत. यात शहर ७६,५००, पश्चिम उपनगर ९७,५०० आणि पूर्व उपनगरातील ४५,००० चौ.मी. क्षेत्रफळातील खड्डे भरले जाणार आहेत.