Link Road Tendernama
मुंबई

मुंबईतील 'या' 8000 कोटींच्या प्रकल्पासाठी बलाढ्य कंपन्यांत स्पर्धा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुलुंड ते गोरेगाव लिंक रोड (GMLR PROJECT) या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या टेंडरसाठी अ‍ॅफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, लार्सन एण्ड टुब्रो आणि एनसीसी-जे.कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट या तीन बलाढ्य कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. मुंबई महापालिका या प्रकल्पावर सुमारे ८ हजार कोटींचा खर्च करणार आहे. अवघ्या ९ महिन्यात टेंडरच्या किंमतीत सुमारे १७०० कोटींची वाढ झाली आहे.

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भूगर्भातून दुहेरी बोगदा खणण्यात येणार असून त्यातून पश्चिम ते पूर्व अशी कनेक्टीविटी मिळणार आहे. उद्यानाच्या गोरेगाव चित्रनगरी ते मुलूंड खिंडीपाडा असे दुहेरी बोगद्याचे काम होणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडले जाणार आहे. या बोगद्याचे काम तीन टप्प्यात होणार आहे. मुंबई महापालिकेने या कामासाठी यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये सुमारे 6,322 कोटीचे टेंडर काढले होते. आता फेरआढाव्यानंतर 8000 कोटी अंदाजित बजेट ठरविण्यात आले असून रिटेंडर काढण्यात आले आहे.

डीझाईन आणि कन्स्ट्रक्शन अशा स्वरुपाच्या कामासाठी आता महिनाभरात टेंडर प्रक्रिया अंतिम केली जाईल असे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. मार्च 2023 पासून हे काम सुरु होणार होते, परंतू रिटेंडर काढल्याने विलंब होणार आहे. साधारण चार वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे ठेकेदारावर बंधन आहे.

प्रकल्पासाठी नाहूर जवळील 711 बांधकामे तसेच त्यापैकी 51 खाजगी बांधकामे पाडावी लागणार आहेत. तसेत 100 प्रकल्पबाधितांचे पुर्नवसन संजय गांधी उद्यानात करावे लागणार आहे. त्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आणि पर्यावरण कायद्यात बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे मेट्रो तीनच्या कारशेड नंतर आता या बोगद्याच्या कामामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या दुहेरी बोगद्यासाठी भूयारी मेट्रो तीन आणि कोस्टल रोडच्या धर्तीवरील टनेल बोअरिंग मशिन टीबीएम मशिनने 4.7 किमीच्या बोगद्यांचे खोदकाम होणार आहे.