Mumbai

 

Tendernama

मुंबई

मुंबईत 'या' कामांवर १३ वर्षांत सव्वा सात हजार कोटींचा धुरळा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत अतिवृष्टीमुळे पाणी तुंबू नये, यासाठी 2009 ते 2021 पर्यंत असे गेल्या 13 वर्षांत 1 हजार 1326 कोटींचा खर्च मुंबई महापालिकेने केला आहे. त्याचबरोबर ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, नाला रुंदीकरण प्रकल्प, पंम्पिंग स्टेशन, पाणी तुंबू नये. यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांवर 6 हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबईत अतिवृष्टीमुळे पाणी तुंबू नये, यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राबवण्यात येत असलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 58 पैकी 42 कामे मुंबई महापालिकेने यशस्वीपणे पूर्ण केली असून 13 कामे प्रगतिपथावर आहेत तर 3 कामांचे टेंडर प्रस्तावित आहेत, अशी माहितीही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

विधान परिषदेत तारांकित प्रश्नोतराच्या तासाला परिणय फुके, भाई गिरकर यांनी मुंबईतील नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला नगरविकासमंत्री शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिले. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित एकूण 8 पर्जन्य जल उदंचन केंद्रांपैकी 6 पर्जन्य जल उदंचन केंद्रासाठी कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. मोगरा येथील पर्जन्य जल उदंचन केंद्रासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी जागेच्या मालकीबाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ सर्वेक्षण आणि आराखडे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

मुंबई महापालिकेने 2015, 2016 आणि 2017 साली नालेसफाईसाठी नेमलेल्या 32 पैकी 24 कंत्राटदारांच्या कामात अनियमितपणा आढळल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. यात 3 कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या 13 कर्मचाऱ्यांवरही दोषारोपपत्र ठेवून त्यांची घनकचरा खात्याच्या विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.