मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका पर्जन्य जलवाहिन्यांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करणार आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पर्जन्य जल वाहिन्या बदलणे, दुरुस्ती करणे, पुनर्बांधणी करणे, पर्जन्य जल वाहिन्यांशेजारी संरक्षक भिंत बांधणे आदी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांना आतील भागात 'जीओपाॅलिमर तंत्रज्ञान' वापरून विशेष प्रकारचे कोटिंग करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका ४१५ कोटी ५८ लाख रुपये खर्च करणार आहे. जीओपाॅलिमर तंत्रज्ञान वापरल्याने पर्जन्य जलवाहिन्यांमधील घाण पाणी रस्त्यावर येणे बंद होणार असून दुर्गंधीचा त्रासही दूर होणार आहे, असा महापालिकेचा दावा आहे.
तसेच महापालिका पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी, बाॅक्स वाहिनीचे बांधकाम, मेजर दुरुस्ती, पर्जन्य जल वाहिनी शेजारी संरक्षक भिंत बांधणे आदी विविध कामांसाठी २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. शहर व उपनगरात पर्जन्य जलवाहिनीचे जाळे विस्तारले आहे. काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या या ब्रिटीश काळापासूनच्या असल्याने जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी बाहेर आल्यास नागरिकांना त्याचा त्रास होतो. कधी-कधी पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. पश्चिम उपनगरात असलेल्या पर्जन्य जल वाहिन्या मजबूत करण्याच्या कामासाठी महापालिका हा खर्च करणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.