Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : 'या' भागांतील जुन्या जलवाहिन्या बदलणार; 42 कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका लालबाग-परळ, अंधेरी, खार, दहिसर या भागांतील जुन्या झालेल्या जलवाहिन्या आता बदलणार आहे. या कामावर 42 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे या भागांतील अपुरा पाणीपुरवठा, पाणी गळती आणि दूषित पाणी पुरवठ्याची समस्या दूर होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जुन्या झाल्या आहेत तसेच पाणी चोरी व गळतीमुळे 900 दशलक्ष लीटर पाणी वाया जाते. जुन्या जलवाहिन्यांमुळे अनेक भागांत अपुरा व दूषित पाणीपुरवठा होतो, अशा तक्रारी रहिवाशी करतात. त्यामुळे या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पश्चिम उपनगरातील एच-पूर्व विभागातील खार, सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिम तर के-पश्चिम विभागातील अंधेरी पश्चिम आणि पूर्व आणि मालाड, दहिसर पश्चिममधील जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. या भागात 100 मिमी, 150 मिमी, 250 मिमी आणि 300 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मध्य मुंबईतील जी-दक्षिण विभागातील प्रभादेवी, जी-उत्तर विभागातील दादर, धारावी, माटुंगा भागात तर एफ-उत्तर विभागातील माटुंगा, किंग्ज सर्कल आणि एफ-दक्षिण विभागातील परळ-लालबाग या भागांतील जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून या जलवाहिन्या बदलल्या जाणार असून त्यासाठी 42 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.