मुंबई (Mumbai) : पावसाळा तोंडावर आल्याने लेप्टोस्पायरोसिसचा फैलाव होण्याचा धोका आहे. लेप्टोला रोखण्यासाठी महापालिकेने तब्बल १ लाख ८५ हजार २७० उंदीर चार महिन्यात मारले आहेत. एक उंदीर मारण्यासाठी महापालिका २२ रुपये खर्च करते, त्यानुसार महापालिकेने ४ महिन्यात सुमारे ४० लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.
पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपेटायसिस आणि डेंग्यू या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा कीटकनाशक विभाग सज्ज झाला आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी किटक नाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते. महापालिकेने १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राबवलेल्या मोहिमेत सर्व २४ वॉर्डात १ लाख ८५ हजार २७० उंदरांना मारण्यात आले. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. दोन ते चार दिवस पाऊस बंद असतो, अशावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक विभागातून देण्यात आली.
भंगार व अडगळीच्या वस्तू घरात ठेवू नका. इमारतीचा परिसर, आवार स्वच्छ ठेवा. डेब्रिज व इतर सामान आवारात ठेवू नये, जेणे करून उंदरांना आसरा मिळणार नाही. अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नये. उंदरांना खायला मिळाले की तिथेच ते बिळे करून राहतात. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
मारलेल्या उंदरांची आकडेवारी
२०१८ - ४,७५,५९०
२०१९ - ४,७७,८८९
२०२० - १, ९८, ४५१
२०२१ - ३,२३,४९३
२०२२ - १,६९,५९६
जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ - १,८५,२७०