BMC Tendernama
मुंबई

Mumbai : ईस्टन फ्री-वेच्या पुलाची बेअरिंग बदलणार; महापालिका करणार 38 कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ईस्टन फ्री वेच्या पुलाच्या खांबावरील पेडेस्टेलमध्ये तडे आढळल्याने पुलाचे बेअरिंग बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मॉरर सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीने बिलो २५ टक्के जात हे काम मिळवले असून यासाठी महापालिका ३८ कोटी रुपये खर्च करणार आहे.

ईस्टन फ्री महामार्गाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने सन २०१४ मध्ये पूर्ण केले. या इस्टर्न फ्री वेच्या कामासाठी एमएमआरडीएने सिम्प्लेक्स इन्फास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची निवड केली होती. या कंपनीने काम पूर्ण करून दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पूर्व मुक्त मार्ग एमएमआरडीएने जिथे आहे जसा आहे, या तत्त्वावर महानगरपालिकेला दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केला होता.  

ईस्टन फ्री वे ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाने सर्वेक्षण केले आणि पुलाच्या खांबावरील पेडेस्टेलचे नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे हे उथळे व बेअरिंगमुळे पुलाचे इतर भाग पिअर कॅप, पीएसपी सेगमेंटल बॉक्स गर्डर यांच्यावरील बांधकामाच्या ताणात वाढ होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. पुलाच्या या बांधकामासाठी मॉरर सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदाराने उणे २५ टक्के दराने बोली लावत विविध करांसह ३८.३१ कोटी रुपयांमध्ये हे टेंडर मिळवले आहे. पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये या इस्टर्न फ्री वेच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.