BMC Tendernama
मुंबई

Mumbai : ईस्टर्न फ्री-वेच्या दुरुस्तीसाठी 24 कोटी; कोंडी फुटणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच ईस्टर्न फ्री वे उभारण्यात आला. मुंबई महापालिकेकडे हा मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये याठिकाणी कोणतेही दुरुस्तीचे किंवा देखभालीचे काम झाले नव्हते. त्यामुळे या मार्गावर वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर काॅलनी, पांजरापोळपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावरील काँक्रीटचा थर खडबडीत होऊन गाडी चालवताना वाहनचालक त्रास सहन करत आहेत. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे उशीरा का होईना मुंबई महापालिकेकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जात असून त्यासाठी २४.४१ कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईच्या पूर्व उपनगरामधून शहरामध्ये मंत्रालय, विधान भवन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी एमएमआरडीएने २०१० मध्ये पी डि'मेलो रोड ते मानखुर्द गोवंडीदरम्यान १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधला. मुंबई महापालिकेकडे २०१५ मध्ये ईस्टर्न फ्री वे देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. या मार्गामुळे पूर्व उपनगरातून २० ते २५ मिनिटांमध्ये मुंबई शहरामध्ये पोहोचणे सोपे झाले. या मार्गामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

मुंबई महापालिकेकडे हा मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये कोणतेही दुरुस्तीचे किंवा देखभालीचे काम झाले नव्हते. त्यामुळे या मार्गावर वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर काॅलनी, पांजरापोळपर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावरील काँक्रीटचा थर खडबडीत झाला आहे. त्यामुळे गाडी चालवताना वाहनचालक त्रास सहन करत आहेत. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच मार्गावर असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती होत आहे. विजेचे दिवे बंद पडल्यामुळे अंधार झाला आहे.

ईस्टर्न फ्री वेच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने मार्च २०२२ मध्ये २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या कामाला महापालिकेला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर वर्षभराच्या कालावधीनंतर महापालिकेला या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त मिळाला आहे. ईस्टर्न फ्री वेच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे. आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या दुरूस्तीमुळे दिलासा मिळणार आहे.