road Tendernama
मुंबई

Mumbai : पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गाच्या खड्डेमुक्तीसाठी 230 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने पावसाळ्याआधीच 'खड्डेमुक्त मुंबई'साठी मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पूर्व द्रुतगती मार्गासाठी 90 कोटी, पश्चिम द्रुतगती मार्गासाठी 140 कोटी आणि महापालिकेच्या 24 वॉर्डसाठी प्रत्येकी 50 लाख असा एकूण 242 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ठेकेदारांना खड्डे भरण्यासाठी 'रिऍक्टिक्ह अस्फाल्ट' आणि 'रॅपीड हार्डनिंग काँक्रिट' तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पावसाळा सुरू होण्यास दोन महिने शिल्लक राहिल्यामुळे महापालिकेने पावसाळापूर्व कामे करण्यासाठी वेग घेतला आहे. महापालिकेच्या अखत्यारीत शहरात सुमारे दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. तर इतर प्राधिकरणांचेही शेकडो किलोमीटर रस्ते महापालिकेच्या हद्दीमधून जातात. इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांसाठी महापालिकेलाच जबाबदार धरण्यात येते. मात्र या वर्षी महापालिकेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी स्वतःकडे घेतल्याने हे कामही महापालिकाच करणार आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याचे काम पावसाळा सुरू होण्याआधी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

दरवर्षी प्रत्येक वॉर्डला रस्तेदुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी दिला जात होता. मात्र यावर्षी कंत्राटदारांच्या माध्यमातून दिसेल तिथे खड्डा बुजवण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. शिवाय वॉर्डना रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी 24 वॉर्डना प्रत्येकी 50 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. खड्डा बुजवल्यानंतर काही काळात त्याठिकाणी आणि आजूबाजूला अनेक खड्डे पडतात. त्यामुळे खड्डा पडलेल्या ठिकाणचा संपूर्ण 'बॅड पॅच' काढून संपूर्ण ठिकाणाची दुरुस्ती महापालिका करीत आहे. तसेच रस्त्याची उखडलेली साईडपट्टी दुरुस्ती करण्याचे निर्देशही कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. यामध्ये भरपावसातही खड्डे बुजवता येणारे 'रिऍक्टिक्ह अस्फाल्ट' आणि अवघ्या सहा तासांत पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करता येणारे 'रॅपीड हार्डनिंग काँक्रिट' तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.