BMC Tendernama
मुंबई

Mumbai : पश्चिम उपनगरातील 'या' रस्‍त्यांचा कायापालट होणार; 178 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील पी उत्तर व आर दक्षिण विभागातील रस्‍त्यांचा कायापालट होणार आहे. या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण केले जाणार आहे. या कामावर सुमारे १७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सर्वाधिक कमी किंमतीचे टेंडर भरलेल्या मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे.व्ही.) कंपनीला हे काम मिळाले आहे.

महापालिकेने पश्चिम उपनगरे येथील परिमंडळ ४ मधील पी उत्तर व परिमंडळ ७ मधील आर दक्षिण विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण व काँक्रिट पॅसेजमध्ये आणि साईड स्ट्रीपची काँक्रीट पॅसेजमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले आहे. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ, संस्थांद्वारे विविध कामांसाठी खड्डे खणणे, पाणी साचून राहणे, जलवाहिन्यांची गळती इत्यादीमुळे हे रस्‍ते खराब झाले असून परिसरातील नागरिक, आमदार व माजी नगरसेवकांकडून रस्त्यांच्या सुधारणेची मागणी होत होती. त्यामुळे त्यांचे मजबुतीकरण व सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ते विभागाने रस्‍ते सुधारणा कामासाठी १५५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. यासाठी ई टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. ठेकेदार मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे.व्ही.) यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा कमी दराची बोली लावल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे.

पुनर्बांधणी व तयार केलेले रस्ते चांगल्या स्थितीत राहावेत याकरिता काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के रक्कम अदा करून उर्वरित २० टक्के रक्कम ही संबंधित रस्ते कामाच्या दोष-दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. ठेकेदारांनी रस्ते तयार करताना दर्जा व गुणवत्ता राखावी, रस्त्यांवर दोष-दायित्व कालावधीमध्ये कोणत्याही त्रुटी निर्माण होऊ नयेत, रस्त्यांच्या परिरक्षणावर खर्च होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध होणार आहेत. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्याकरिता गुणवत्ता निरीक्षक संस्था (क्यू.एम.ए.) यांची नेमणूक करण्याची तरतूद टेंडर मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचा दोष-दायित्व कालावधी १० वर्षे इतका आहे, तर रस्त्यांच्या कामावर एकूण १७८ कोटी खर्च केले जाणार आहेत.