मुंबई (Mumbai) : मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर आता ओशिवरा, दहिसर, पोयसर नद्यांना प्रदूषण, सांडपाणी व अतिक्रमणमुक्त करून या नद्या पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. या दोन्ही नद्यांच्या परिसरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यावर मुंबई महापालिका सुमारे १,४०० कोटी खर्च करणार आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ सारख्या भयानक पूरस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. त्यांनी सूचवलेल्या उपाययोजनांनुसार पालिकेने प्रथम मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम हाती घेऊन ते गेल्या काही वर्षात तडीस लावले. तसेच, मिठी नदीचा जास्तीत जास्त भाग अतिक्रमणमुक्त केला. मिठी नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती व रस्तेही बांधण्यात आले. आता मिठी नदीचे प्रदूषण कमी करण्यावर व मिठी नदीला स्वच्छ व सुंदर बनविण्यावर आणि मिठी नदीला पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला जात आहे. मिठी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी अडवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येणार आहे. याच धर्तीवर पश्चिम उपनगरातील दहिसर व पोयसर या दोन्ही नद्यांचे विकास काम हाती घेण्यात येणार आहे.
दहिसर व पोयसर या नद्यांच्या परिसरातील बेकायदा बांधकामे हटवणे, नदीची रुंदी व खोली वाढवणे ही कामे करण्यात येणार आहेत. तसेच, दहिसर व पोयसर या नद्यांमधील प्रदूषण व सांडपाणी रोखणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नद्यांच्या पात्रात सोडणे अथवा त्या पाण्याचा पुनर्वापर करणे, नदी परिसरातील अतिक्रमण हटविणे व पात्र घरांचे पुनर्वसन करणे आणि संरक्षक भिंती उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत. वास्तविक, मुंबईतील या नद्यांमधील प्रदूषणावरून हरित लवाद व प्रदूषण नियंत्रण मंडळानेही मुंबई महापालिकेला चांगलेच झापले आहे.
दहिसर व पोयसर नदी पुनरुज्जीवित करत असताना मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मलनि:स्सारण वाहिन्यातील पाणी नदीत जाऊन नये यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येणार असून पोयसर नदी परिसरात १० ठिकाणी सांडपाणी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येणार आहेत. या प्लांट मध्ये रोज ३३ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच, दहिसर नदी परिसरातही दोन ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ६.५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही नद्यांच्या विकास कामासाठी मुंबई महापालिका १,४०० कोटी खर्च करणार आहे.