BMC Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिका रुग्णालये होणार हायटेक; 'एचएमआयएस'साठी 352 कोटींचे कंत्राट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी हेल्थ केअर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (एचएमआयएस) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम रेल्वे मंत्रालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रम 'रेलटेल'ला सुमारे ३५२ कोटीत सोपवण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील १९१ दवाखाने, ३० प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, पाच विशेष रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय असलेली दंत रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधांसह प्रमुख रुग्णालये समाविष्ट केली जातील.

महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी एचएमआयएसचा पुरवठा, स्थापना, चाचणी, कमिशनिंग, ऑपरेशन आणि देखभाल करण्याचे काम 'रेलटेल' करणार आहे. एचएमआयएसचे मूळ उद्धिष्ट उत्तम रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांची आरोग्य सेवा आहे. रुग्णसेवा, क्लिनिकल आणि नॉन-क्लिनिकल सेवा, क्लिनिकल सुविधा आणि औषधांच्या यादी व्यवस्थापनाशी अखंडपणे जोडून आरोग्यसेवा प्रशासनात महत्त्वपूर्ण परिवर्तनाचा अंदाज या प्रकल्पात आहे. एचएमआयएसच्या या उपक्रमाचा उद्देश शहरातील प्राधिकरणाद्वारे व्यवस्थापित केलेली सर्व रुग्णालये एकमेकांशी जोडणे आहे. प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी, क्लाउड होस्टिंग आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी ऑपरेशन आणि देखभाल सोबत मनुष्यबळ नियुक्ती देखील समाविष्ट आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी एक वर्षाची आहे.

एचएमआयएस ॲप्लिकेशन रुग्ण, रुग्णालये आणि महापालिका प्रशासन यासारख्या सर्व संबंधितांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणार आहे. रुग्ण, रुग्णालये आणि महापालिका प्रशासनासाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले जाईल, ज्याचा वापर त्वरित संबंधित डेटा काढण्यासाठी केला जाऊ शकतो. रेलटेलने यापूर्वीच एचएमआयएस कार्यान्वित केली आहे, ज्यामध्ये भारतीय रेल्वेच्या ७०९ आरोग्य युनिट्सचा डिजिटलाइज्ड आरोग्य डेटा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणला आहे.