मुंबई (Mumbai) : महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा आश्रय प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात आलेला असताना आता महापालिका चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावरील वसाहतीच्या पुनर्विकासाठी तब्बल 304 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
महापालिकेने आश्रय योजनेअंतर्गत आता 1 हजार 800 कोटी हून अधिक रक्कमेच्या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र, भाजपच्या तक्रारींची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना राज्याच्या लोकायुक्तांना दिल्या आहेत. त्यातच महापालिकेने आणखी एका वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आणला आहे. लोखंडे मार्गावरील या वसाहतीत सध्या सफाई कामगारांची 404 घरे आहेत. त्या बदल्यात पालिकेला 300 चौरस फुटाची 794 घरे आणि 600 चौरस फुटाची 174 घरे मिळणार आहे. यासाठी महापालिका 304 कोटी रुपयांचा खर्च करणार असून सर्व कर धरुन हा खर्च 400 कोटींवर जाणार आहे.
चर्चा तर होणारच
महापालिकेने 15 हजार 190 चाैरस मीटरच्या या भूखंडाच्या पुनर्विकासात चार चटई क्षेत्र निर्देशांक धरुन 60 हजार 763 चौरस मीटरचे बांधकाम करण्याचा आराखडा तयार केला होता. त्यातून पालिकेला 300 चौरस फूटाची 1 हजार 246 घरे आणि 600 चौरस फूटांची 155 घरे मिळणे अपेक्षित होती. प्रत्येक चौरस फूटासाठी महानगर पालिकेने 4 हजार 346 रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. त्यानुसार निविदाही मागविण्यात आल्या होत्या. मात्र, पात्र ठेकेदाराने 65 हजार 55 चौरस मीटरचे बांधकाम करुन 300 चौरस फुटांची 794 घरे आणि 600 चौरस फूटाची 174 घरे उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे. प्रामुख्याने सफाई कामगारांच्या पुनर्विकासाठी असलेल्या या योजनेत कामगारांना 300 चौरस फूटाची घरे दिली जाणार आहेत. मात्र, विकसक महापालिकेच्या अंदाजापेक्षा 300 चौरस फुटाच्या 452 सदनिका कमी देणार आहे. तर, 600 चौरस फुटाच्या 19 सदनिका अधिक देणार आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रफळांच्या घरांचे काय होणार असा प्रश्न आहे. ठेकेदाराने 4 हजार 348 रुपये प्रत्येक चौरस फूट दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे.