Mumbai Tendernama
मुंबई

'या' महापालिकेच्या अग्नीशमन दलात ९०२ उमेदवारांची मेगाभरती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई अग्निशमन दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती होणार असून त्याबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. थेट मुलाखतीने ९०२ जणांची मेगाभरती होणार असून येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यात ३० टक्के म्हणजे २७० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांपासून अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत होती. या भरतीमुळे मुंबई अग्निशमन दलाचे बळ आणखी वाढणार आहे.

मुंबई अग्निशमन दलात २०१७ मध्ये ७५० कर्मचाऱ्यांची शेवटची भरती झाली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकाही कर्मचाऱ्याची नव्याने भरती झाली नाही. अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढतीने भरण्यात येत असल्या, तरी कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईतील वाढत्या आगीच्या किंवा इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यात अनेक अडचणी येत होत्या.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने महापालिका आयुक्तांकडे पदभरतीचा प्रस्ताव पाठवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने मेगाभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा अग्निशमन दलामध्ये होणारी भरती ही थेट मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी अग्निशमन दलात भरती प्रक्रियेसाठी टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जात होती. या वेळी मात्र भरती प्रक्रिया लवकर संपवायची असल्याने इतर बाबींना फाटा देऊन अग्निशमन दलाकडूनच शारीरिक चाचणी आणि थेट मुलाखत घेऊन पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अग्निशमन दलाच्या मेगाभरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यानुसार एकूण ९०२ जागांपैकी २७० जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे महिलांना ही मोठी संधी प्राप्त होणार आहे. सध्या दलात केवळ १०८ महिला कर्मचारी आहेत. त्यात आता २७० महिलांची भर पडणार असल्याने त्यांची संख्या ३७५च्या पुढे जाणार आहे. सध्या मुंबईत ३५ अग्निशमन दल केंद्रे आहेत. यापैकी ४ केंद्रे ही मागील पाच वर्षांत उभारण्यात आली आहेत. मुंबई अग्निशमन दलामध्ये नवी केंद्र सुरू करण्यात आली, तरी त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती न केल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनावरच नव्या केंद्राची देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला होता.

मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रांमध्ये साधारणतः २८०० अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे. मुंबई शहराचा आवाका पाहता साधारणतः २५ टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दर महिन्याला ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होतात. त्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा बढती प्रक्रियेने भरल्या गेल्या; मात्र फायरमनसारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त राहिल्याने प्रत्येक केंद्रावर साधारणतः २० टक्के कर्मचार्यांचा तुटवडा आहे.

मुंबई अग्निशमन दलामध्ये सर्वात मोठी भरती प्रक्रिया प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे; मात्र त्यात काही सुधारणा सूचवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्यात आले असून पुढील महिन्याभरात भरतीचा मार्ग मोकळा होईल.

- हेमंत परब, मुख्य अग्निशमन अधिकारी