BMC Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिका 'त्या' 3 पुलांची पुनर्बांधणी करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका मुलूंड आणि भांडूपमध्ये तीन नवे पूल बांधणार आहे. या भागातील काही पूल जुने झाले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. नव्या पुलांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्याची अपेक्षा आहे. या तीन पुलांसाठी मुंबई महापालिका सुमारे २२ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुलूंड पूर्व येथील नानेपाडा नाल्यावरील पूल जुना झाला आहे. त्यामुळे तो पूल पाडून आता नव्याने बांधण्यात येत आहे. तर मुलूंड पश्चिमेकडील सेवाराम लालवाणी रोड आणि शिव मंदिराजवळील पूल आणि भांडूप येथील बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पूल यांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुलूंड पूर्व, जयहिंद कॉलनी मिठागर परिसराला जोडणाऱ्या नानेपाडा नाल्यावरील पूल अरूंद आहे. त्यामुळे या पुलावरून मोठी वाहने वळविण्यास मोठी अडचण होते. त्यामुळे या पुलाचे रूंदीकरण करण्याची मागणी तत्कालीन नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने या पुलाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.

पश्चिमेकडील सेवाराम लालवाणी रोड आणि शिव मंदिराजवळील पुलांचे कामही केले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी नानेपाडा पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु नाल्याच्या खोलीकरणाचे काम करत असताना जमिनीत मोठा खडक लागला. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून गाळ काढण्याचे काम काही काळ थांबविण्यात आले होते. खडक फोडून इतर कामे मार्गी लागल्यानंतर आता पुन्हा पुलाच्या स्लॅबचे काम सुरू आहे. भांडूपमधील बॉम्बे ऑक्सिजन नाला हा मोठा नाला आहे. हरिश्चंद्र कोपरकर मार्ग हा भांडूप पूर्वेकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. गोरेगाव-मुलूंड लिंक रोडच्या जंक्शनपासून त्याला उतार आहे. हा उतार नाहूर पुलाच्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे आणखी खडतर होईल, तो वाहनांच्या वाहतुकीला अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाचे काम केले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.