tab

 

Tendernama

मुंबई

'बीएमसी'त बाजारभावापेक्षा चौपट दरात टॅब खरेदीचा घाट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पुन्हा एकदा ऑनलाइन शाळा सुरु करण्याची वेळ येऊ शकते. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) पालिकेच्या शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 19 हजार 959 टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका तब्बल 38 कोटी 72 लाख रुपये मोजणार आहे. याचा अर्थ एका टॅबची किंमत 19 हजार 959 रुपये याप्रमाणे रक्कम मोजणार आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा आरोपांचे बाण सुटण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कोविड संसर्गावर अलीकडेच नियंत्रण मिळविल्यानंतर महापालिकेने इयत्ता ८ वी ते १० वीच्या शाळा उघडल्या. त्यानंतर इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळा सुद्धा नुकत्याच उघडण्यात आल्या होत्या. मात्र काही आता मुंबईत पुन्हा एकदा कोविड सोबत नवीन प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ चे रुग्ण पटापट आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईत कोविडची तिसरी लाट सुरु झाली आहे.

दिल्लीमध्ये कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतही कोविडचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन शाळा सुरु झाल्याने महापालिकेच्या शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 19 हजार 959 टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी बीएमसी तब्बल 38 कोटी 72 लाख रुपये मोजणार आहे. 19 हजार 959 रुपये याप्रमाणे एका टॅबची खरेदी केली जाणार आहे. बाजारात सरासरी 4 ते 5 हजार रुपयांत मिळणाऱ्या टॅबसाठी महापालिका जवळपास 20 हजार रुपये मोजणार आहे, असे दिसते.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर आक्षेप घेऊन विरोधक भाजपकडून सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करीत घेरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.