Freeze Tendernama
मुंबई

बापरे! मुंबई महापालिकेने कोविडमध्ये फ्रिज खरेदी केले एवढ्या दराने?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumabi) : कोविड (Covid 19) काळात मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) केलेल्या खर्चावर पूर्वीपासूनच आक्षेप घेतला जात असताना आता एक 'थंड' घोटाळा उघड होत आहे. महानगर पालिकेने सेव्हन हिल्स (Seven Hills) रुग्णालयात चढ्या दराने फ्रिजची (Freeze) खरेदी केली आहे. यात पालिकेला काही लाखांचा अधिकचा खर्च करावा लागला असला तरी हा कोविड काळात झालेल्या चढ्या खर्चाच्या हिमनगाचे टोक असल्याचे मानले जात आहे.

महापालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयासाठी गोदरेज कंपनीचे 290 ते 310 लिटर क्षमतेचे 44 फ्रीज विकत घेतले होते. या प्रत्येक फ्रिजसाठी महानगर पालिकेने 44 हजार 648 रुपये मोजले, अशी माहिती महानगर पालिकेच्या उपप्रमुख अभियंता यांत्रिकी व विद्युत विभागाने दिली. खुल्या बाजारात या फ्रिजची किंमत 37 ते 38 हजारांच्या आसपास आहे. पालिकेने प्रत्येक फ्रिजमागे साधारण 6 हजार जास्त मोजले असून यापैकी एकूण दोन लाख 64 हजार रुपये जास्त मोजले आहेत.

महापालिकेने कोविड काळात प्रतिबंध, उपचार तसेच नवी रुग्णालये तयार करणे, जम्बो सेंटर उभारणे यासाठी तब्बल अडीज हजार कोटी रुपयांहून अधिकच खर्च केला आहे. कोविड काळात महापालिकेचे कामकाज होत नसल्याने प्रशासनाला विशेष अधिकार देऊन खर्च करण्याची परवानगी दिली होती. पालिकेने अनेक ठिकाणी चढ्या दराने खर्च केल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मात्र, प्रशासनासह, सत्ताधारी शिवसेनेने या खर्चाला क्‍लिन चिट दिली आहे. फ्रिज खरेदी ही तर अंदाधूंद खर्चाचे एक टोक असल्याची चर्चा आहे.

महापालिकेने थेट कंपनीकडून ही खरेदी केली असती तर बाजार भावापेक्षा कमी दर मिळाला असता. मात्र, महापालिका बहुतांश खरेदी मध्यस्थांमार्फत करते, त्यामुळे हे मध्यस्थ पालिकेला का लागतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अशा मध्यस्थांच्या मार्फतही खर्च करण्यात येत आहे. अनेक बाबींमध्ये असाच प्रकार झाला आहे. त्यामुळे अशा अवाजवी खर्चाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. तसेच फ्रिज खरेदीसाठी काही हजार, लाख रुपये जास्त खर्च केला गेला. पण, हा प्रश्‍न फक्त फ्रिज खरेदी पुरता मर्यादित नाही. महानगर पालिकेने कोविड काळात अडीज हजार कोटींहून अधिकचा खर्च केला आहे. तो खर्चही असाच असणार, त्याची चौकशीही करण्याची मागणी होत आहे.