मुंबई (Mumbai) : परळ (Parel) टीटी येथील धोकादायक झालेला ब्रीज मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नव्याने बांधणार आहे. या ठिकाणी नवीन गर्डरसह दोन्ही बाजूकडील एक्सपेंशन पॉइंट (सांधे) बदलण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका 16 कोटी 95 लाख 6 हजार 619 रुपये खर्च करणार असून हे टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 'हिमालय' पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीकर आला. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट दर सहा महिन्यांनी करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. तर आता पुलांच्या धोक्याचा अलर्ट देणारा सेंसर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत परळ टीटी येथील 40 वर्षे जुना पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने टेंडर जाहीर केले असून पावसाळा वगळून 9 महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करणे कंत्राटदारास बंधनकारक आहे. परळ टीटी येथील हा ब्रीज 250 ते 300 मीटर आहे. या पुलावर दोन्ही बाजूस मिळून 44 एक्सपेंशन पॉईट असून वाहनांची ये - जा सुरू असताना चालकांना हादरे बसतात. त्यामुळे फक्त तीन ते चार एक्सपेंशन पॉइंट ठेवण्यात येणार आहेत. पुलाचा मधील भाग तसाच ठेवत बाकी भाग काढण्यात येणार आहे. शिवाय दोन्ही बाजूचे कॉलम काढण्यात येणार असून तीन पिलरवर नवीन पूल बांधण्यात येईल.