मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईत होणारी पाण्याची गळती आणि दूषित पाणी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने जलवाहिन्यांचे काम हाती घेतले आहे. यासाठी 28 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गळतीमुळे 27 टक्के पाणी वाया जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्या जलवाहिन्या टाकणे, गळती रोखणे अशा उपाययोजना केल्या जातात. या पार्श्वभूमीवर आता दक्षिण मुंबईतील कुलाबा, भायखळा, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर व मलबार हिल परिसरातील दूषित पाणी व गळती रोखण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल सहा हजार किमीचे जलवाहिन्यांचे नेटवर्क आहे. या जलवाहिन्यांची वेळोवेळी दुरुस्ती, देखभाल करावी लागते. शिवाय मुंबईत सुरू असलेल्या विविध प्राधिकरणांच्या कामांमुळे देखील जलवाहिन्या फुटणे, गळती सुरू होण्याचे प्रकार घडत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.