Hospital Tendernama
मुंबई

Mumbai : पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी गुड न्यूज; 'त्या' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 503 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विक्रोळीतील महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या जागेवर लवकरच सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार आहे. मुंबई महापालिकेने नुकतेच या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले असून सुसज्ज रुग्णालय व स्टाफ क्वॉर्टर्ससाठी तब्बल ५०३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ५०० बेड्स, स्टाफ क्वॉर्टर्स सोयीसुविधांसह विक्रोळीत हे सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभे राहणार आहे. म्हाडाने क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाला याआधीच हिरवा कंदील दाखवला आहे. आता रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर विक्रोळी, कांजूर, भांडुप, पवई परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा जोतिबा फुले रुग्णालय हे विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि भांडुपमधील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे होते. १९८० साली उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ८ वर्षापूर्वी बंद करण्यात आली आहे. तसेच येथे अपुऱ्या सुविधा, आवश्यक यंत्रसामगी नसल्याने या परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा केल्याने म्हाडाने पुनर्विकासासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील तीन ते चार वर्षांत विक्रोळीकरांना अद्ययावत सुसज्ज सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळणार आहे.

पूर्व उपनगरात विक्रोळी येथील महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाची इमारत जुनी व धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली आणि रुग्णालय इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मात्र पुनर्विकासाच्या कामात तांत्रिक अडचणी आल्याने रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. या रुग्णालयाशेजारी म्हाडाचा सुमारे ३२ हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड असून तो एकत्रित करून पुनर्विकासात ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. तळघर, तळमजला अधिक १३ मजल्यांची रुग्णालय इमारत असून २१ मजल्यांची डॉक्टर आणि परिचारिकांसाठी निवासी इमारत असणार आहे. ३२ हजार ८२५ चौरस मीटर क्षेत्रफळावर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास होणार आहे. रुग्णालय व स्टाफ क्वॉर्टर्स परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले जाणार आहे. तसेच स्टाफ क्वॉर्टर्स इमारतीत सभागृह, उपहारगृह, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ओपीडी अशा सोयीसुविधा असणार आहेत. महापालिकेतर्फे ५०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाच्या बांधकामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. तळ अधिक १३ व तळ अधिक २१ मजली इमारत बांधण्यात येणार असून क्षेत्रफळ ५७८२.२७ चौरस मीटर आहे. तर एकूण बांधकाम क्षेत्र हे ४३५७१.९४ चौरस मीटरवर होणार आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उपवास्तू शास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी दिली.