मुंबई (Mumbai) : वांद्रे पूर्व येथील नवीन स्कायवॉकसाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे ८३ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, एकाच वर्षात १६ कोटींच्या टेंडरमध्ये ४०० ते ५०० पटीने वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यावर वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी, अपघाताची शक्यता लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 'एमएमआरडीए'ने स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कलानगर असा पहिला स्कायवॉक सन २००८ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्थानकाबाहेर एकूण ३६ स्कायवॉक बांधण्यात आले. त्यासाठी तब्बल ६०० हून कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले. सुमारे १.३ किमी लांबीचा असलेला वांद्रे स्कायवॉक प्रा. अनंत काणेकर मार्गावरील रिक्षांची अनागोंदी आणि बेशिस्त वाहतुकीमुळे पादचारी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरला होता.
दररोज हजारो प्रवासी या स्कायवॉकचा वापर करत होते. परंतु एमएमआरडीएने हा स्कायवॉक मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला; २०१९ मध्ये हा स्कायवॉक धोकादायक जाहीर करत महापालिका प्रशासनाने स्कायवॉक बंद केला. २०२१ मध्ये हा स्कायवॉक पाडून वांद्रे स्थानक ते वांद्रे न्यायालय नवीन स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाडकाम व नवीन बांधकामासाठी १६ कोटी रुपये खर्चाचे टेंडर मागवण्यात आले होते. कंत्राट मंजुरी व कामाचे आदेश देण्यात आले होते. या स्कायवॉकचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर जुने टेंडर रद्द करण्यात आले. दरम्यान, आता पुन्हा नव्याने टेंडर मागवण्यात आले असून, बांधकाम खर्चात तब्बल ४०० ते ५०० पट अधिक वाढ करण्यात आली आहे. २०२४ अखेरपर्यंत हा स्कायवॉक पूर्ण करण्याचे नियोजन आहे.