मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध स्कायवॉकचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत सुमारे ८० कोटींचा खर्च केला जाणार आहे. इलेक्ट्रोकूल इंजिनिअरींग आणि एएससी पॉवर प्रा.लि. या कंपन्यांना हे टेंडर मिळाले आहे. मुंबईतील स्काय वॉक सुशोभीकरण योजनेअंतर्गत स्कायवॉकची ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका जिंकण्याच्या हेतूने भाजपाने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 1,705 कोटींतून मुंबईच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईतील स्काय वॉक सुशोभीकरण योजनेअंतर्गत स्कायवॉकची ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
बोरीवली, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ (पूर्व) , सांताक्रुझ (पश्चिम) , विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व ), घाटकोपर (पश्चिम), भांडूप, सायन, कॉटनग्रीन, नानाचौक आणि वडाळा आदी स्कायवॉकवर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. इलेक्ट्रोकूल इंजिनिअरींग कंपनीने बोरीवली आणि अंधेरीतील स्कावॉक प्रकाशित करण्यासाठी ‘अ’ श्रेणीचे टेंडर पटकावले असून त्यावर 20.52 कोटी खर्च केला जाणार आहे. याच कंपनीने ‘डी’ श्रेणीसाठी कॉटन ग्रीन, नाना चौक आणि वडाळा येथील स्कायवॉक प्रकाशित करण्यासाठी 17.14 कोटींचे टेंडर मिळवले आहे.
एएससी पॉवर प्रा. लि. या कंपनीला बी आणि सी गटातील टेंडर मिळाले असून बी गटात गोरेगाव, सांताक्रुझ आणि विलेपार्ले येथील स्कायवॉकचा 18.05 कोटीतून तर घाटकोपर, भांडुप, सायन या सी वर्गवारीच्या स्कायवॉकचे 18.52 कोटीतून सुशोभीकरण होणार आहे. याअंतर्गत एलईडी स्ट्रीप लाईट, ट्यूब आणि फ्लड लाईट बसविण्यात येणार आहेत. या कंपन्या येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करणार असून त्यांना तीन वर्षांचे मेन्टेनन्सचे कामही देण्यात आले आहे.