BMC Tendernama
मुंबई

Mumbai : बीएमसीचे उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अखत्यारीतील दुरवस्था झालेल्या उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, ज्येष्ठांसाठी मनोरंजनाची सुविधा, जॉगिंग ट्रक अशा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सुविधांसाठी मुंबई महापालिका सुमारे ७ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे.

मुंबई महापालिकेची 350 हून जास्त उद्याने असून त्याची देखभाल मुंबई महापालिकेकडून नियमितपणे केली जाते. मात्र काही उद्यानांची दुरवस्था झाली असल्यामुळे अशा उद्यानांचा वापर रहिवाशांना करता येत नाही. उद्यानातील खेळाची साधने, बसण्यासाठी असलेले बेंच, हिरवळ, अंतर्गत पायवाटा यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम उपनगरातील आणि पूर्व उपनगरातील उद्यानांच्या सुशोभीकरणाला सुरुवात झाली असून चेंबूरमधील महात्मा गांधी मैदान, मराठी गार्डन आणि अतुर पार्कचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या उद्यानांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी महापालिकेच्या चेंबूर एम-पश्चिम विभाग कार्यालयाकडे आल्या होत्या. या उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी 6 कोटी 89 लाख 32 हजार 856 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर मागवण्यात आले आहे. पात्र कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील 12 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.