Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : डेब्रिजमुक्तीसाठी बीएमसीचा मोठा प्लान; 2100 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) शहरातील रस्ते, मोकळ्या जागा डेब्रिजमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेवारस राडारोड्यास अटकाव करण्यासोबत वैध पद्धतीने राडारोडा नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मे. मेट्रो हँन्डलिंग प्रायव्हेट लि. आणि एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या ठेकेदार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. २० वर्षांच्या या कंत्राटापोटी २१०० कोटी मोजले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत सध्या रस्ते, उड्डाणपूल, स्कायवॉक, चौपाट्या, वाहतूक बेटे आणि चौकांचे सुशोभीकरण आणि रंगरंगोटी केली जात आहे. तसेच विविध रंगांची उधळण करणारी विद्युत रोषणाईही केली जात आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १,७०५ कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र, या सुशोभीकरण मोहिमेला बांधकामातून निघणाऱ्या डेब्रिजमुळे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या साडेतीन हजारहून अधिक बांधकामे सुरु आहेत. यातून प्रतिदिन मोठ्या प्रमाणावर  राडारोडा (डेब्रिज) तयार होतो. अनेकवेळा बांधकामांचा किंवा इतर तयार होणारा राडारोडा रस्ते, चौक, उद्याने व मोकळ्या जागांवर अवैधपणे फेकला जातो. यामुळे मुंबईत अस्वच्छता निर्माण होऊन शहर प्रदूषित होते व याचा आरोग्याला धोका निर्माण होतो.

बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रक्रिया व विल्हेवाटीची सुविधा निर्माण करणे अनिवार्य आहे. बेवारस राडारोड्यास अटकाव करण्यासाठी तसेच वैध पद्धतीने निष्काषित करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या एकात्मिक प्रकल्पांतर्गत शहराला दोन गटात विभागले आहे. गट अ मध्ये शहर व पूर्व उपुनगरातील १५ प्रशासकीय विभाग व गट ब मध्ये पश्चिप उपनगरांत ९ प्रशासकीय विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे.

महापालिकेने २० वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. महापालिकेने यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांना सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. राडा रोडा विल्हेवाटीसाठी महापालिकेने २०१७ पासून कंत्राटदार नेमण्याची प्रयत्न सुरु होते. मात्र टेंडरला अल्प प्रतिसाद मिळत होता शिवाय अनेक टेक्निकल गोष्टींमुळेही अनेक टेंडर रद्द करण्यात आली. अखेर आता कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आल्याने डेब्रिजमुक्त मुंबई करण्याच्यादृष्टीने महापालिकेने पाऊल उचलले आहे.

दररोजचा ६०० मेट्रिक टन राडारोडा उचलण्यासाठी - १,४२५ प्रती मेट्रिक टन प्रमाणे एक वर्षासाठी ३१ कोटी २० लाख ७५ हजार रूपये पालिका पहिला वर्षी मोजेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात १०३१ कोटी ८९ लाख ९३ हजार ११० निर्धारित करून लघुत्तम प्रतिसादात्मक ठेकेदार मे. मेट्रो हँन्डलिंग प्रायव्हेट लि. यांना २० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे.

तर आणखी एका टेंडरचा भाग म्हणून महापालिकेकडून रोज ६०० मेट्रिक टन राडारोडा उचलण्यासाठी - १०४१ प्रती मेट्रिक टन प्रमाणे एक वर्षासाठी ३० कोटी ९८ लाख ८५ हजार रूपये मोजण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या वर्षापासून ५ टक्के वाढ करून २० वर्षात एक हजार २४ कोटी ६६ लाख ५५ हजार २२० रुपयांचे काम एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. यांना २० वर्षासाठी देण्यात आले आहे. या दोन्ही टेंडरला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही रक्कम एकाचवेळी न देता दरवर्षी ३० ते ३२ कोटी याप्रमाणे देण्यात येणार आहे. या दोन्ही संस्थांनी ६०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प ५ एकर जागेवर उभारून २० वर्षांसाठी तो चालवायचा आहे.