bridge Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' वॉर्डमध्ये 7 पुलांसाठी 51 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील नाल्यांवरील अनेक छोटे पूल धोकादायक झाले आहेत. या धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. टी आणि एस वॉर्डमधील एकूण सात छोट्या पुलांची निर्मिती पूल विभागाकडून केली जाणार आहे. यासाठीची टेंडर प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या कामावर ५१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुलुंडमधील नानेपाडा नाल्यावरील टी वॉर्डमध्ये असलेला पूल मोडकळीस आला आहे. या पुलाचे पुनर्बांधकाम आणि जुन्या बांधकामाचे पाडकाम केले जाणार आहे. तसेच एस वॉर्डमध्ये जीएमएलआर कोपरकर मार्गाचे जंक्शन येथे बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णयदेखील पूल विभागाने घेतला आहे. यासह याच विभागातील शिवमंदिर मुलुंड (पू.) जवळील पुलाचे पुनर्बांधकामही केले जाईल. अशा प्रकारे टी वॉर्ड मध्ये दोन पुनर्बांधणी, एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

भांडुप परिसरातील 'एस' वॉर्डमध्ये नाल्यावरील पुलाचे काम आणि पाडकामही प्रस्तावित आहे. या भागातील भांडुप स्टेशन पूर्व गेटजवळील पूल तसेच स्टेशन पूर्व दोन गेटजवळील पूल आणि एसएलआर डायग्नोस्टिक भांडुप पश्चिम जवळील भांडुप गाव रोड येथील पुलाचे काम केले जाणार असून यासोबत टागोरनगर गायकवाड उद्यानासमोर, विक्रोळीपूर्व येथील पुलाचे कामदेखील केले जाणार आहे. पुलांच्या कामासाठी जे काळ्या यादीत आहेत किंवा ज्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ते वगळून कंत्राटदारांच्या नेमणुकीसाठी पूल विभागाकडून टक्केवारी दरावर ऑनलाईन टेंडर मागवली आहेत. यातील टी आणि एस वॉर्डमधील पहिल्या तीन पुलांच्या कामासाठी एकूण १७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत; तर एस वॉर्डमधील चार पुलांसाठी ३४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे काम पावसाळा धरून २४ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. ११ सप्टेंबरपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

या पुलांचा समावेश
मुलुंडमध्ये

१ एस. एल. रोड मुलुंड (प.)
२ शिवमंदिर मुलुंड (पू.)जवळील पूल
३ बॉम्बे ऑक्सिजन नाल्यावरील पूल

भांडुपमध्ये
१. भांडुप स्टेशन पूर्व १ गेटजवळील
२. भांडुप स्टेशन पूर्व २ गेटजवळील
३. एसएलआर डायग्नोस्टिक्स भांडुप पश्चिमजवळील भांडुप
गाव रोड.
४. टागोरनगर गायकवाड उद्यानासमोर, विक्रोळी पूर्व.