BMC Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' पुलाच्या पोहोच रस्त्यांसाठी महापालिकेकडून 55 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्यावतीने कर्नाक बंदर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या सुरु असून पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधकामासाठी नव्याने टेंडर मागवण्यात आले आहे. या कामासाठी ५५ कोटींचा खर्च होणार आहे.

शहरातील मस्जिद बंदर येथील लोकमान्य टिळक मार्ग येथील कर्नाक पूल धोकादायक ठरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने पाडल्यानंतर पुलाचे बांधकाम आणि पोहोच रस्त्याचा भाग पाडून त्याचे पुनर्बांधकाम करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झालेली आहे. या पुलाचा आराखडा व संरचनात्मक बांधकाम याकरिता भारतीय रेल्वेची संशोधन डिझाईन आणि मानक संस्था अर्थात आरडीएसओ, इंडियन रोड काँग्रेसनुसार झालेल्या विविध सुधारणा व बदलांमुळे मंजूर केलेल्या कंत्राटाच्या किंमतीत ४६ टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

पूल विभागाच्या उच्चपदस्थांच्या माहितीनुसार मंजूर केलेली रक्कम ही केवळ रेल्वे हद्दीतील पुलाकरिताच खर्च होणार आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधकामाकरता नव्याने टेंडर मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी विविध करांसह ५५.८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी कामांसाठी महापालिकेच्यावतीने 'बुकॉन इंजिनिअर्स एँड इन्फारस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ची निवड करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी यापूर्वी सुमारे ५३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती, परंतु या खर्चात पुलाच्या पोहोच मार्गाचे काम होणार नसल्याने यासाठी आता आणखी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.