Hancock Bridge Tendernama
मुंबई

Mumbai: 'त्या' पुलांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचे 87 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सुमारे दीडशे पुलांच्या मजबुतीसाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ८७ कोटींचा खर्च करणार आहे. यामध्ये पुलांचा पाया मजबूत करणे, पृष्ठीकरण, बेअरिंग बदलणे आणि आवश्यक डागडुजीची कामे केली जाणार आहेत. महापालिकेने नुकतेच हे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

अंधेरीतील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या पूल विभागाने मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि रेल्वेवरील पुलांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये ४४९ लहान - मोठे पूल आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. त्यात उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग, नाल्यावरील पूल, आकाश मार्गिका यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात महापालिकेने पूर्व उपनगरांतील पुलांच्या देखभालीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. आता महापालिकेने पश्चिम उपनगरांतील पुलांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. पश्चिम उपनगरांतील वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी पूर्व परिसरातील पुलांच्या देखभाल - दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपये, तर मालाड, गोरेगाव, अंधेरी पश्चिमेकडील पुलांच्या देखभालीसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदारांना ही कामे १८ महिन्यांमध्ये पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये पुलाच्या बेअरिंग बदलणे, पुलावरील तडे सिमेंट काँक्रिटने भरणे, दुभाजकांची दुरुस्ती, रंगकाम, स्टील पट्ट्या टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

आयआयटीच्या सूचनेनुसार, शहरातील १५ पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर आता पश्चिम उपनगरातील १५० हून अधिक पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी नुकतेच टेंडर मागवण्यात आले असून पात्र ठेकेदारास वर्क ऑर्डर देण्यात येईल. या पुलांची दुरुस्ती पावसाळ्यासह १५ महिने, १८ महिने व २४ महिन्यांत पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे.