Nala Safai Tendernama
मुंबई

Mumbai : नालेसफाईचे 180 कोटींचे टेंडर का रखडले?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील नाले सफाईचे काम दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. मात्र यंदा अद्यापही टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीत लहान-मोठे नाले व नद्या स्वच्छतेचे काम वेळेत पूर्ण होणे कठीण आहे. त्याचमुळे मुंबईतील नाले सफाईचा मुद्दा विधानसभेतही गाजला. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी नाल्यांच्या सफाईला होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात नाला सफाईचे काम लवकरच सुरू होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

यासंदर्भात महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, नाल्याच्या सफाईचे काम आतापासून सुरू व्हायला हवे होते. मात्र, द्याप टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, टेंडर फायनल झाल्यानंतर वर्क ऑर्डर देण्यासाठी ७ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. अशा स्थितीत 15 ते 20 मार्चपूर्वी नाले सफाईचे काम सुरू होणे अपेक्षित नाही. यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, त्याला सर्वस्वी आयुक्त जबाबदार असतील.

मुंबईतील नाले सफाईचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. मात्र यंदा अद्याप टेंडर निघालेली नाही. मुंबईतील लहान-मोठे नाले आणि नद्यांच्या सफाईसाठी महापालिकेने 31 टेंडर काढली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 3 टेंडर काढण्यात आली आहेत. महापालिका या वर्षी नाल्यांच्या सफाईवर 180 कोटी रुपये खर्च करत आहे, गेल्या वर्षीच्या 150 कोटी रुपयांपेक्षा 30 कोटी रुपये जास्त आहे.

नाले सफाईचे काम तीन टप्प्यात केले जाते. पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत सुमारे 75 टक्के नाले सफाईचे उद्धिष्ट ठेवण्यात आले होते, तर यंदा 80 टक्के नाले साफ झाल्याचा दावा केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पावसाळ्यात 10 टक्के नाल्यांची सफाई केली जाणार आहे. पावसाळ्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान उर्वरित 10 टक्के नाल्यांची सफाई केली जाणार आहे. नाल्यांच्या स्वच्छतेमुळे पावसाचे पाणी वेगाने समुद्रात जाते. त्यामुळे पाणी तुंबण्याची परिस्थिती उद्भवत नाही.

मुंबईत 309 मोठे नाले असून, त्यांची लांबी 290 किमी आहे. लहान नाल्यांची संख्या 1508 आहे. ज्यांची लांबी 605 किमी आहे. महापालिकेच्या मतानुसार, महापालिका मुख्यालयाभोवती सुमारे 32 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पूर्व उपनगरात सुमारे 100 किमी लांबीचे मोठे नाले आहेत. पश्चिम उपनगरात सुमारे 140 किलोमीटरचे मोठे नाले आहेत. त्याचबरोबर रस्त्याखाली 3134 किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन आहे. ही समस्या टाळण्यासाठी महापालिका दरवर्षी नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र वेळेत नाल्यांची सफाई न केल्यामुळे मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी, पावसाळ्याच्या अगोदर, महापालिका आयुक्त चहल यांनी नाल्यांची 114 टक्के सफाई केल्याचा दावा केला होता, परंतु मुंबईच्या वरच्या भागातही पाणी साचले होते.