मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात बाहेरुन येणाऱ्या बसेसना मुंबईच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात येणार आहे. यासाठी जकात नाक्यांच्या मोकळ्या जागेवर भव्य परिवहन व व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे. लवकरच ही टेंडर प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग यांनी दिली. पहिल्या टप्प्यात दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांच्या सुमारे ४८ हजार मीटर मोकळ्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे. पाठोपाठ मुलूंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलूंड एलबीएस मार्ग, ऐरोली या जकात नाक्यांचा विकास करण्यात येणार आहे.
मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूलासह कोस्टल रोड, गोरेगाव मुलूंड लिंक रोड सारखे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक परिवहन सेवेचा सर्वाधिक नागरिकांनी वापर करावा यासाठी मेट्रोचे जाळे मजबूत केले जात आहे. या सर्वांचा विचार करताना बेस्ट बेस्ट कनेक्टिवीटी वाढवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात बेस्टची संख्याही वाढवण्यात येणार आहे. राज्य व परराज्यातून हजारो प्रवासी बस मुंबई शहरात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने जकात नात्यांच्या मोकळ्या जागेत वाहतूक हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुलूंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलूंड एलबीएस मार्ग, ऐरोली, दहिसर व मानखुर्द चेक नाक्यावरून येणाऱ्या बसेसचा सर्व्हे करण्यात आला होता. यात दररोज सुमारे ८ ते ९ हजाराहून अधिक बसेस मुंबईत येत असल्याचे दिसून आले. या बसचा प्रवास चेक नाक्यावरच संपवल्यास मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र बनवून त्यास शहराच्या उर्वरित परिवहन सेवा म्हणजेच बेस्ट, मेट्रो आणि टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर यासारख्या वाहतूक व्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नाक्यावरच बसचा प्रवास संपून त्या बसमधून आलेल्या प्रवाशांना शहरातील परिवहन सेवा उपलब्ध होणार आहे. वाहतूक केंद्रासोबतच हा भूखंड पूर्ण क्षमतेने विकसित करुन त्यामध्ये व्यावसायिक ऑफिससाठी जागा, दुकाने, ट्रान्झिस्ट, हॉटेल, कन्व्हेन्शन सेंटर, प्रदर्शन केंद्र आदींचा विकास केला जाणार आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. जकात कर बंद झाल्यानंतर येथील जागा विनावापर पडून आहेत. मानखूर्द जकात नाक्याच्या जागेचे क्षेत्रफळ सुमारे २९ हजार चौरस मीटर तर दहिसर जकात नाक्यावर १८,८६९ चौरस मीटर मोकळी जागा आहे. या जागांवर भव्य परिवहन व व्यावसायिक केंद्र उभारणे शक्य आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ५ कोटी ८० लाख रुपये शुल्क दिले जाणार आहे.