Mumbai Tendernama
मुंबई

मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्यासाठी महापालिकेची 472 कोटीची टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असून नव्याने 472 कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत पूर्व उपनगर 164 कोटी, पश्चिम उपनगर 281 कोटी आणि मुंबई शहरसाठी 26 कोटींचा खर्च केला जाणार आहे. मुंबई महापालिकेने या कामांची टेंडर प्रसिद्ध केली असून साधारण येत्या जानेवारी महिन्यापासून ही कामे सुरु केली जाणार आहेत. यामध्ये नाले दुरुस्ती, नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलणे, पाणी वाहून नेण्याची क्षमता दुप्पट करणे, नाले रुंदीकरण-दुरुस्ती, नालेसफाई ही कामे केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

मुंबई समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर वसलेले असल्याने अतिवृष्टीप्रसंगी समुद्राला भरती असल्यास पाण्याच्या विसर्गाला अडथळा येत असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी 2006 पासून 'ब्रिमस्ट्रोवॅड' उपक्रमांतर्गत महापालिकेच्या माध्यमातून पाणी तुंबण्याचे प्रमाण, ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पालिकेने आतापर्यंत हाजी अली, रे रोड, करळी लक्हग्रो, क्लिक्हलँड आणि जुहू या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारली आहेत.

या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला हजारो लिटर पाणी उचलून समुद्रात फेकले जात असल्याने पाणी तुंबण्याची समस्या कमी होत आहे. शिवाय पावसाळ्यात पाणी तुंबणार्या ठिकाणी पंपही बसवण्यात येतात. यावर्षी तुंबणारे पाणी उपसण्यासाठी पालिकेने तब्बल 480 पंप बसवले होते. तर आता कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी व्यापक प्रमाणात नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने टेंडर मागवली आहेत. जानेवारीपासून ही कामे सुरू करण्याचे उद्धिष्ट आहे.

मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी 50 मिमी पाऊस झाला तरी पाणी वाहून नेण्याची आहे. मात्र गेल्या काही कर्षांत वातावरणात झालेल्या बदलांमुळे मुंबईत दोन ते तीन दिवसांत एक महिन्याचा म्हणजेच सुमारे 1 हजार मिमी पाऊस पडल्याचे प्रकार घडत आहेत. अशा ढगफुटीसदृश पावसामुळे मुंबईत पाणी तुंबण्यासोबतच जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे, पूर येणे अशा समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्यासाठी कार्यकाही सुरू आहे. त्यामुळे अतिवृष्टीतही पाणी तुंबणार नाही.