मुंबई (Mumbai) : मुंबईमध्ये पावसाचे पाणी नाल्यांच्या माध्यमातून समुद्रात वाहून जाण्यासाठी पर्जन्यजलवाहिन्यावर २५ हजार मॅनहोल आहेत. तसेच मलनि:स्सारण विभागाचे शहर विभागात २७०७८, पश्चिम उपनगरात ३१६२१, पूर्व उपनगरात १५९८३ असे एकूण ७४ हजार ६८२ असे एकूण एक लाख मॅनहोल आहेत. या मॅनहोलमध्ये पडून अनेकवेळा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत २९ ऑगस्ट २०१७ राेजी झालेल्या मुसळधार पावसात लोअर परळ येथून चालत प्रभादेवी येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले सुप्रसिद्ध डॉ. अमरापूरकर यांचा दीपक टॉकीजजवळ मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. तर या मॅनहोलमधून निघणाऱ्या घाणेरड्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी मुंबई महापालिका १२ तासांत मॅनहोलची दुरुस्ती करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. यासाठी महापालिकेने ३० कोटींचे टेंडर मागवले.
मुंबईमध्ये पावसाचे पाणी नाल्यात तसेच मलनिस्सारणाचे घाणीचे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने सर्वत्र पाईपलाईनचे जाळे उभारले आहे. या पाईपलाईनच्या स्वच्छतेसाठी अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर झाकणे बसवण्यात आली आहेत. अनेकवेळा मलनिस्सारणाचे घाणीचे पाणी या झाकणामधून बाहेर येऊन रस्त्यावर येते. यातून नागरिकांना रस्ता काढता चालावे लागते. तसेच या घाणीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने नाकावर रुमाल घेऊन नागरिकांना ये जा करावी लागते. घाणीच्या पाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
मॅनहोलमधून घाणीचे पाणी येत असल्यास महापालिकेकडे तक्रारी केल्या जातात. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. वेळीच दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच मॅनहोलवरील झाकणे तुटल्याने नागरिक आत पडून अपघात होऊ शकतात. यासाठी एखाद्या भागातून मॅनहोल तुटलं तुंबलं अशी तक्रार आल्यास १२ तासांत दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी टेंडर मागवण्यात आले असून पात्र कंत्राटदारास २०२३ - २४ पर्यंत कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यासह पुढील दोन वर्षे हे कंत्राट देण्यात येणार आहे. मॅनहोल तुटलं, तुंबलं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होताच त्या मॅनहोलची दुरुस्ती करणे आणि मुंबईकरांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे उद्दिष्ट असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.