Mumbai  Tendernama
मुंबई

26 एप्रिल ते 15 मे मिशन सक्सेसफुल; मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या 'त्या' दोन दिवशी नेमके काय घडले?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक सांधणारा तब्बल अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा दुसरा बो आर्च स्ट्रिंग गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.

हवामानानुसार अंदाज घेवून गेल्या २६ एप्रिल रोजी पहिली तुळई स्थापन करण्यात आली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसरी तुळई स्थापन करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पथकाचा आत्मविश्वास दुणावला होता. बुधवारी पहाटे ३ वाजेपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही तुळई आधी स्थापन केलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर सकाळी ६ वाजून ७- मिनिटांनी अडीच हजार मेट्रीक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने गर्डर एकमेकाला जोडण्यात आला. पहिल्या गर्डरचा अंदात घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पारण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या गर्डरपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरी गार्डर स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते. परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली.

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही गर्डरवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोस्टल रोड वर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या गर्डरपेक्षा तुलनेने दुसरी तुळई ही वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई ३१.७ मीटर रुंद, ३१ मीटर उंच आणि १४३ मीटर लांब आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतर फरक लक्षात घेता दुसरी गर्डर स्थापन करणे आव्हानात्मक होते. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवारी सकाळी दुसरी गर्डर घेवून तराफा निघाला होता.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरक्त महापालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.