Uday Samant Tendernama
मुंबई

Mumbai : मनपातील रस्त्याच्या कामांचे टेंडर विहित पद्धतीनेच : सामंत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेतील रस्त्यांच्या कामांची टेंडर प्रक्रिया विहित पद्धतीचा अवलंब करून राबविण्यात आलेली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

मुंबई महापालिकेतील टेंडरमध्ये अनियमितता तसेच राणीच्या बागेचे आरक्षण बदलणे याबाबत विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, याला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने ज्या टेंडर काढलेली आहेत, त्यामध्ये विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेली AW 252 व AE 144 या दोन टेंडर यामध्ये समाविष्ट नाहीत. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, त्या संदर्भातील ही सर्व टेंडर आहेत. तरीही याबाबत प्राप्त तक्रारींची तपासणी केली जाईल. राणीच्या बागेच्या आरक्षणाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या लक्षवेधीच्या अनुषंगाने उपप्रश्न उपस्थित केला होता. मुंबईतील 19 हजार विहिरींपैकी अनेक विहिरी नामशेष झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यांची अद्ययावत माहिती घेऊन पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवावी, असे निर्देश दिले.