मुंबई (Mumbai) : महापालिकेने आगामी वर्षात अग्निशमन दलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात 745 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत प्रकल्प आणि नवीन साधनांच्या खरेदीचा समावेश आहे.
उंच इमारतींमधील लागणाऱ्या आगाची धोका लक्षात घेऊन यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी उंच लॅडर आणि हायड्रॉलिक फ्लॅटर्फामची खरेदी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर दुर्घटनांच्या वेळी जलद प्रतिसाद देण्यासाठी क्विक रिस्पॉन्स वाहनांसह मिनी फायर स्टेशन सुरु करण्यात येणार आहेत. ही जलद प्रतिसाद वाहने विभाग कार्यालयांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.
24 फायरबाईकची खरेदी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर अग्निशमन दलातील जवान आणि अधिकाऱ्यांना वेळावेळी अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज फायर स्टेशनवर ड्रिल टॉवर कम मल्टी युटिलिटी ट्रेनिंग सिम्यूलेटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), एलबीएस रोड, कांजूर मार्ग (प.), जुहू तारा रोड सांताक्रूझ (प), माहुल रोड चेंबूर आणि आंबोली, अंधेरी (प) येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
आगामी वर्षात होणारी खरेदी -
- अग्निशमन, पाळत ठेवणे आणि मूल्यांकनासाठी फायर ड्रोनची खरेदी.
- मिनी फायर स्टेशन्स आणि महानगरपालिका प्रभागांसाठी क्विक रिस्पॉन्स वाहनांची खरेदी.
- हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि टर्न टेबल लॅडरसह एकत्रित अग्निशमन कम बचाव वाहनांची खरेदी.
- फायर रोबोट्सची खरेदी.
- इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी.
- जुनी आणि कालबाह्य वाहने बदलणे.
सुरु असलेले प्रकल्प -
- अग्निशमन करताना पाणी आणण्यासाठी तीन जलवाहतूक वाहने.
- 55 मीटरचे वॉटर टॉवर वाहन
- उंच इमारतींसाठी अग्निशमन वाहन
- 64 मीटर उंचीचे दोन टर्न टेबल लॅडर
- 70 मीटर उंचीचा 1 हायड्रोलिक प्लॅटफॉर्म
- 50 मीटर उंचीचा 1 हायड्रोलिक प्लॅटफॉर्म
- 32 मीटर उंचीचा 1 एरियल लॅडर प्लॅटफॉर्म