Gokhale Bridge Andheri Tendernama
मुंबई

Mumbai : 20 वर्षांपासून रखडलेल्या 'त्या' पुलासाठी अखेर टेंडर; 42 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सदरम्यान गेल्या 20 वर्षांपासून रखडलेला पूल लवकरच मार्गी लागणार आहे. या पुलासाठी मुंबई महापालिकेने नुकतेच टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामावर ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

या पुलामुळे 30 ते 45 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे. 2002 मध्ये या पुलासाठी 14 कोटींचा खर्च अपेक्षित होता, मात्र पूल रखडल्याने हा खर्च आता 42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

यारी रोड ते लोखंडवाला यादरम्यान पुलाचा प्रकल्प 2002 पासून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2012 मध्ये या प्रकल्पासाठी टेंडरही काढले होते. लोखंडवाला येथील खाडीने यारी रोडपासून वेगळे केले आहे आणि या दोन ठिकाणांमध्ये थेट संपर्क नसल्याने वाहनचालकांना चार आणि सात बंगला येथून वळसा घालून जावे लागते. यासाठी रहदारीच्या वेळी तब्बल 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आता नव्या पुलामुळे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत कापले जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे खारफुटीवर परिणाम होणार असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हा पूल रखडला होता. या पार्श्वभूमीवर पुलाच्या बांधकाम रचनेत आवश्यक बदल केल्यामुळे पुलाचा मार्ग मोकळा झाल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.