BMC Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' कंत्राटदाराला निष्काळजीपणा भोवला; बीएमसीने ठोठावला तब्बल 1 कोटी 33 लाखांचा दंड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : निष्काळजीपणे काम करून जलवाहिनी फोडल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने मेट्रोच्या 'ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड' या कंत्राटदाराला 1 कोटी 33 लाख 62 हजारांचा दंड ठोठावला आहे. मेट्रो-6 च्या कामात ड्रिलिंग करताना अंधेरी पूर्व सीप्झजवळ शुक्रवारी 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. पश्चिम आणि पूर्व उपनगरातील नऊ परिसरांचा पाणीपुरवठा तब्बल पाच दिवस विस्कळीत झाला होता.

अंधेरी पूर्व सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ 30 नोव्हेंबरला मेट्रो-6 च्या कामाचे ड्रिलिंग सुरू असताना 1800 मिलिमीटर व्यासाच्या वेरावली जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला धक्का बसला आणि जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, वांद्रे तसेच घाटकोपर, चांदिवली, कुर्ला, भांडुप परिसरांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अखेर 50 तासांच्या कामानंतर सोमवारी जलवाहिनीची दुरुस्ती झाली, मात्र काही परिसरांत अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशा ठिकाणी महापालिकेकडून अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

दरम्यान, दहिसर पूर्व-चेकनाका येथे अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना पालिकेची पाणीपुरवठा करणारी नऊ इंचाची जल वाहिनी फुटली. या घटनेची माहिती जल विभागाला मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती हाती घेतल्याने पाणीपुरवठा तातडीने सुरळीत झाल्याचे जल विभागाकडून सांगण्यात आले. दहिसर पूर्व-चेकनाका, हारेम टेक्स्टाईल, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना नऊ इंचाची जलवाहिनी फुटली. यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेले. जल विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मुंबई महापालिकेच्यावतीने मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ञ नागरिक, महापालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सूचवणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ञ समितीमार्फत गुरुवारी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक-2 ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे.