BMC Tendernama
मुंबई

Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई महापालिकेने मोठी कारवाई सुरु केली आहे. अशा निष्काळजी ठेकेदारांना आतापर्यंत सुमारे ३१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व कामे वेगाने करण्यात येत आहेत. या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत.

मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. पावसाळ्यात नाल्यांमधून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी महापालिकेकडून 31 मार्चपर्यंत गाळ काढण्याचे काम केले जाते. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण 10 लाख 21 हजार 782 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पावसाळापूर्व कामांमधील नालेसफाईत मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 23 हजार 631 मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या 61.03 टक्के गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये 15 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांपैकी 31 ठिकाणी कामात निष्काळजीपणा, त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. मार्चपासून नाल्यांतून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली.

मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी व तपासणी करण्यात आली. यामध्ये शहर विभागातील 12 ठिकाणच्या कंत्राटदारांचा (19 लाख 75 हजार रुपये), पूर्व उपनगरातील 10 कंत्राटदारांचा (7 लाख 20 हजार रुपये) आणि पश्चिम उपनगरातील 9 कंत्राटदारांचा (3 लाख 88 हजार रुपये) समावेश आहे. कामातील त्रुटीनुसार दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या देय रकमेतून ही दंडाची रक्कम कापून घेण्यात येणार आहे.