Mumbai Tendernama
मुंबई

मुंबई : महत्त्वाच्या 'या' ब्रीजचे काम बीएमसी २ वर्षात करणार पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई पश्चिम उपनगरामध्ये अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम  कनेक्टिव्हिटीसाठी महत्वाच्या गोखले ब्रीजचे काम दोनच वर्षात पूर्ण होणार आहे. रेल्वेच्या भागातील कामदेखील मुंबई महापालिकेनेच करावे या रेल्वेच्या विनंतीमुळे चार वर्षांचा प्रकल्प आता दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. २५७ मीटर अंतराच्या पुलाच्या कामासाठी सुमारे ११२ कोटींचे बजेट होते. आता रेल्वेच्या ९० मीटरच्या अतिरिक्त कामामुळे प्रकल्पाचा खर्च देखील वाढणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील ब्रीजचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सल्लागार नेमले होते. त्यामध्ये पश्चिम उपनगरातील गोखले ब्रीज हा अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने तातडीने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा असा सल्ला एससीजी कन्सलटन्सी सर्व्हीसेस लिमिटेडने सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अहवालात दिला होता. तसेच याठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी असेही त्या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले होते. ब्रीजच्या संपूर्ण भागात अनेक ठिकाणी गर्डरमध्ये स्टीलचा भाग गंजला असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक भागातील बेअरिंग खराब झालेल्या असून अनेक भागात स्लॅबचा भागही कोसळल्याचे अहवालात आहे. अनेक ठिकाणी स्टीलचा भागदेखील कॉंक्रिट पडून खुला झाल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने एससीजी कन्सलटन्टने तीनवेळा सर्वेक्षण केले. त्यामध्ये आढळलेल्या गंभीर बाबींमुळेच हा ब्रीज बंद करावा असा निष्कर्ष सल्लागाराकडून काढण्यात आला. या ब्रीजची गंभीर परिस्थिती पाहून याआधीच अवजड वाहनांसाठी २०२० पासूनच ब्रीज बंद करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने गोखले ब्रीजच्या ठिकाणी दोन टप्प्यात काम हाती घेतले होते. याठिकाणी पहिल्या टप्प्यातील काम हे वाहतूक विभागाची एनओसी सहा महिने लांबल्याने आधीच या कामाची डेडलाईन पुढे गेलेली आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील काम हे आता मार्च २०२३ मध्ये पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये दोन्ही दिशेच्या ब्रीजच्या जोडणीच्या भागांचा समावेश आहे. पालिकेकडून २५७ मीटरच्या दोन टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. तर रेल्वेनेही आता त्यांच्या क्षेत्रातील काम पालिकेने करावे अशी विनंती केली आहे. त्यामध्ये ९० मीटरच्या अतिरिक्त भागाचा समावेश या कामामध्ये पडणार आहे. पालिकेने रेल्वेकडे केलेल्या मागणीनुसार रेल्वेला डीसी एसी विद्युतीकरणाच्या प्रकल्पात याठिकाणी ओव्हरहेड वायरची उंची वाढवणे अपेक्षित आहे. त्यामुळेच याठिकाणीही पालिकेने काम करावे असे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यासाठीचा आराखडा हा आयआयटी मुंबईकडून मंजूर करून घ्यावा अशी अट रेल्वेने घातली आहे. त्यामुळे लवकरच आयआयटी मुंबईकडून या ड्रॉईंग्जना परवानगी मिळेल अशी अपेक्षा रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. तर पालिकेच्या मागणीनुसार रेल्वे ब्लॉकच्या कालावधीत या ब्रीजचे तोडकाम करण्याची जबाबदारी रेल्वेने घ्यावी अशी मागणी पालिकेने केली आहे. त्यानंतर गर्डर लॉंच करण्यासाठीचे काम पालिकेकडून करण्यात येईल असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पालिकेने हाती घेतलेल्या २५७ मीटर अंतराच्या ब्रीजच्या कामामध्ये एकुण ११२ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु आता रेल्वेच्या अतिरिक्त कामामुळे प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. याआधीच्या अटीनुसार पालिका रेल्वेला या ब्रीजच्या कामाचे पैसे देणार होते. पण लोअर परळचा आणि हॅंकॉक ब्रीजचा रेल्वेचा अनुभव पाहता यावेळी रेल्वेने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये रेल्वेच्या भागातील ९० मीटरचा खर्चही आणि कामही आता पालिकेला करावे लागणार आहे.

वाहतुकीच्या पर्यायांसाठी मुंबई पोलिसांचा वाहतूक विभाग हा येत्या दिवसांमध्ये वाहतुकीच्या पर्यायी मार्गांचे नियोजन जाहीर करणार आहे. त्यामुळे ब्रीज चार वर्षे बंद ठेवण्यापेक्षा या ब्रीजचे काम दोन वर्षात युद्धपातळीवर करणे पालिकेलाही शक्य होईल. सल्लागारांनी दिलेल्या अहवालानुसार या ब्रीजच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी कमी होणे शक्य होईल. मुंबईकरांच्या सुविधेसाठीच प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे आमचे उद्धिष्ट आहे.
- संजय कौंदयपुरे, मुख्य अभियंता, ब्रीज विभाग, मुंबई महापालिका