Coastal Road Tendernama
मुंबई

Coastal Road : कोस्टल रोडचे 70 टक्के काम पूर्ण; नोव्हेंबरपासून...

12 हजार 721 कोटी रुपये खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्प यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मुंबई महापालिकने आखले आहे. कोस्टल रोडच्या कामापैकी आतापर्यंत एकूण 70.48 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करून हा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंतच्या 10.58 कि.मी. लांबीच्या या रस्त्यामुळे सुमारे 70 टक्के वेळेची बचत होईल. इंधन, ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणात घट होईल.

या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मलबार हिलपासून वरळी सी फेसपर्यंत तब्बल सात किलोमीटर लांबीचा अत्यंत सुंदर समुद्र किनारा लाभणार आहे. या किनाऱ्यावर हिरवीगार उद्याने, सायकल ट्रक, जॉगिंग ट्रक आणि कोस्टल रोडच्या मार्गावर नावीन्यपूर्ण प्रकाश योजना असेल. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

कोस्टल रोडच्या कामापैकी आता एकूण 70.48 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील सुरू असलेल्या बोगद्याचे 91 टक्के काम पूर्ण झाले असून 79 टक्के समुद्रभिंतीचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या प्रकल्पासाठी एकूण 111 हेक्टर क्षेत्रावर भराव घालण्यात आला आहे.

सध्या या कोस्टल रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील जवळजवळ 70 हेक्टर हरित क्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण आणि बांधण्यात येणाऱ्या सागरी तटरक्षक भिंतीमुळे सागरी किनाऱ्याची धूप होणार नाही. वादळी लाटांपासूनही संरक्षण होईल. कोस्टल रोडच्या मार्गावर मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली, महालक्ष्मी मंदिर आणि वरळी येथे सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या कोस्टल रोड अंतर्गत 2.7 कि.मी. लांबीचे दुहेरी बोगद्यांचे काम सुरू असून जवळपास 11 मीटर अंतर्गत व्यासाचे हे बोगदे आहेत. या बोगद्यात अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा असणार असून बोगद्यात अग्निशमन यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास चार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे.