Mumbai Tendernam
मुंबई

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील अडथळा दूर; बांधकामांवर बुलडोझर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या 55 अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने बुलडोझर फिरवल्यामुळे एस विभाग भांडुपमध्ये रस्त्याची रुंदी 30 मीटरवरून 45.75 मीटर करता येणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम 8 हजार 850 कोटी रुपये खर्चून महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे.

'जीएमएलआर'ने पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येतील. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी 12.2 किमी असून यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली दोन 4.7 किमी लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटरमधील अतिक्रमणे महापालिकेने हटवली आहेत. या धडक कारवाईसाठी 2 जेसीबींसह आवश्यक यंत्रसामुग्री वापरण्यात आली. या कारवाईसाठी महापालिका अधिकाऱ्यांसह 25 कामगारांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मोकळ्या करण्यात आलेल्या भागात उड्डाणपुलांचे बांधकाम मार्गी लागणार आहे. या धडक कारवाईनंतर मोकळ्या केलेल्या भागाचा ताबा महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती 'एस' विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली.