Mumbai Tendernama
मुंबई

बोरिवली उड्डाणपुलाचे बांधकाम उत्कृष्टच; पृष्ठभागावर अत्याधुनिक...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) येथील आर. एम. भट्टड मार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावर खडी निघत असल्या कारणाने या पुलाच्या बांधकाम दर्जावर टीका झाली होती. राजकीय पक्षांनीही या बांधकामाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उडवली होती. पण मुंबई महापालिकेने मात्र याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. पुलावर कोणतेही वाहन घसरुन अपघात होवू नये यासाठी पृष्ठभागावर अत्याधुनिक अँटी-स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या दिसत असलेली बारीक खडी ही या पद्धतीमुळे आढळत असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असून ही खडी दररोज नियमितपणे काढून मार्ग स्वच्छ राखण्यात येतो. येत्या २ ते ३ आठवड्यात ही बारीक खडी निघून येणार नाही. या पुलाचे बांधकाम उत्कृष्ट रितीने करण्यात आले आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. वापरलेली बारीक खडी ही निघून येणार नाही व हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित राहील.

बोरिवली (पश्चिम) येथील आर. एम. भट्टड मार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण १८ जून २०२२ रोजी करण्यात आले. हा उड्डाणपूल सुमारे ९३७ मीटर लांबीचा आहे. पुलावर अत्याधुनिक अशा अँटी स्किड सर्फेसिंग (ANTI-SKIDDING TREATMENT) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे पुलावरुन जाणारे कुठलेही वाहन विशेषतः दुचाकी वाहन घसरणार नाही व त्यामुळे कुठलाही अपघात किंवा जीवितहानी होणार नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

अँटी स्किड सर्फेसिंग (ANTI-SKIDDING TREATMENT) पद्धतीच्या वापरामुळे वरवर असलेली खडी निघणे अपेक्षित आहे. कारण तो या पद्धतीतीलच एक भाग आहे. या निघणार्या खडीचे प्रमाण अत्यल्प आहे. निघालेली खडी दररोज व नियमितपणे काढून पुलावरील मार्ग स्वच्छ करण्यात येतो. अँटी स्किड सर्फेसिंग (ANTI-SKIDDING TREATMENT) चा मुख्य हेतू म्हणजे कोणतेही वाहन घसरुन अपघात होऊ नये पर्यायाने वाहन घसरुन जीवितहानी होऊ नये, हाच आहे. कारण, अलीकडे काही रस्त्यांवर तसेच उड्डाणपुलांवर गुळगुळीत पृष्ठभागांवर काही वाहने विशेषतः दुचाकी घसरुन अपघात झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन या अत्याधुनिक अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचा पृष्ठभाग सुरक्षित करण्यात आला आहे. २ ते ३ आठवड्यानंतर अँटी स्किड सर्फेसिंग (ANTI-SKIDDING TREATMENT) करीता वापरलेली बारीक खडी ही निघून येणार नाही व हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित राहील.