Nala safai Tendernama
मुंबई

Mumbai : मिशन नालेसफाई; 250 कोटींचे बजेट, 31 ठेकेदारांची नियुक्ती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील पावसाळापूर्व नालेसफाईला महापालिकेने सुरुवात केली आहे. शहर, उपनगरात छोट्या-मोठ्या नाल्यांतील तसेच द्रुतगती महामार्गालगतचे नाले, मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी ३१ ठेकेदार नियुक्त केले आहेत. महापालिका या नालेसफाईवर सुमारे २५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले व नदीतील गाळ काढला जातो. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के  पावसाळ्यादरम्यान, तर १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. नालेसफाईची कामे दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरू होतात. मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेकवेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी, काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र, छोट्या नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांचे पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला होणारी नालेसफाई यंदा उशिराने सुरू झाल्याने कंत्राटदारांना ३१ मेपूर्वी १० लाख २२ हजार १३१ मेट्रिक टन गाळ उपसा करावा लागणार आहे.

२०२२ वर्षात नालेसफाई ११ एप्रिल रोजी सुरू झाली होती. यावेळी काम पूर्ण करताना महापालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. २०२३ मध्ये ६ मार्चपासून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तिसऱ्या आठवड्यानंतर काम सुरू झाल्यामुळे महापालिकेपुढे वेगाने काम करून उद्धिष्ट गाठण्याचे आव्हान राहणार आहे. मिठी नदीचे काम सुरू झाले असून ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेचे ५० हजारांहून अधिक मनुष्यबळ जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईसह सर्वच कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. देखरेखीसाठी मनुष्यबळाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही लावले होते, यंदा देखील या कामांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

एकूण छोटे नाले : 1508 (लांबी 605 किमी)
एकूण मोठे नाले : 309 (लांबी 290 किमी)
रस्त्याखालील ड्रेन : 3134 किमी