मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) चालू आर्थिक वर्षात ६ हजार कोटी रुपये मालमत्ता कर आकारणीसाठी सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने 2023-24 या वर्षात 100 टक्के कर वसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे उद्धिष्ट पूर्ण करण्यासह कर आकारणीसाठी सल्लागाराची मदत घेतली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जकात बंद झाल्यामुळे आता एकमेव मालमत्ता कर हे उत्पन्नाचे साधन बनले आहे. जकातीच्या भरपाईपोटी जीएसटी अनुदान सहाय्य म्हणून महापालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षात 12 हजार 344 कोटी रुपये मिळणार आहेत. यातून मुंबई महापालिकेचा आस्थापना खर्च, शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा खर्च भागणार नाही. त्यामुळे यावेळी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यात येणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात सरासरी 6 हजार कोटी रुपये मालमत्ता कर मिळणे अपेक्षित आहे. पण दरवर्षी जेमतेम 60 ते 70 टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात महापालिकेला यश येते. त्यामुळे यावेळी कर आकारणीसाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून महिन्याभरात सल्लागाराचे कामकाज सुरु होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत 100 टक्के कर वसुलीचे लक्ष गाठता येईल, असे महापालिकेतील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. 2022-23 या आर्थिक वर्षात 30,743 कोटी 61 लाख रुपये महसुली उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षित होते. मात्र यात तब्बल 1 हजार 855 कोटी 98 लाख रुपये इतकी घट झाली. 2023-24 या आर्थिक वर्षात 33 हजार 990 कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळेल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे 100 टक्के मालमत्ता कर वसुलीवर भर राहणार आहे.
महापालिकेचे इतर उत्पन्न स्त्रोत :
विकास नियोजन – 4400 कोटी
बँकांमधील गुंतवणुकीचे व्याज – 1,707 कोटी 24 लाख
पाणीपट्टी 1965 कोटी 64 लाख