मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात मुंबईतील पूर्व व पश्चिम महामार्गावरील प्रवास अडथळ्यांशिवाय व्हावा यासाठी त्याखालील नालेसफाईवर मुंबई महापालिकेने यंदा विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिका त्यासाठी 11 कोटी रुपये खर्च करणार आहे. दोन्ही मार्गावरील कल्व्हर्टची सफाई करण्यासाठी महापालिकेने यंदा स्वतंत्र टेंडर मागवली होती. याद्वारे पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.
एमएमआरडीएने मुंबई महापालिकेकडे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग 3 ऑक्टोबर 2022 रोजी हस्तांतरित केले. महापालिकेच्या ताब्यात आल्याने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील नाल्यातील गाळ आता महापालिका काढणार आहे. पश्चिमउपनगरांमधील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध छोटे-मोठे नाले, पेटिका नाले तसेच रस्त्यालगत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्यवाहिन्यांमध्ये वाहून येणारी माती, घाण, कचरा आदी जमा होतो. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमधून सांडपाणी व काही प्रमाणात मल वाहून नेला जात असला तरी याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्याची सफाई केली जाणार आहे तर पूर्व द्रुतगती महामार्गावर 16 मोरी पेटिका म्हणजे कल्व्हर्ट असून या मार्गावरील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी यातील गाळाची सफाई केली जाणार आहे.
दोन्ही मार्गावरील कल्व्हर्टची सफाई करण्यासाठी महापालिकेने यंदा स्वतंत्र टेंडर मागवली होती. यासाठी पूर्व उपनगरांसाठी दोन टेंडर आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशा प्रकारे पाच टेंडर मागवण्यात आली होती. यासाठी पाच ठेकेदारांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी तुंबू नये, यासाठी मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली असून त्यासाठी एकूण 180 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.