मुंबई (Mumbai) : वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत आठ एकर भूखंडावर व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने घेतला आहे. हा भूखंड वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्वला जोडणाऱ्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असल्याने याठिकाणी व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय झाला असून, लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या चौकापासून ते वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयापर्यंतची आठ एकर जागा मुंबई मंडळाची आहे. ही जागा व्यावसायिक वापरासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मुंबई मंडळाचा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी, तसेच भविष्यात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी येथे व्यावसायिक संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा वांद्रे परिसरातील मोक्याच्या ठिकाणी असल्याने म्हाडाकडून या जागेचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिलिंद बोरीकर यांनी दिली.
वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत म्हाडाचा तब्बल ३० हजार चौ. मी.चा भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाले असल्याने आता या भूखंडाचा विकास करण्यापूर्वी झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत योजना राबवून येथील झोपडपट्टी धारकांना हटविण्यात येईल. काही दिवसांपूर्वी या जागेत गृहनिर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र या जागेत व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. वांद्रे येथील या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून म्हाडा व्यावसायिक संकुल उभारणार आहे.
म्हाडाचे मुंबई आणि उपनगरात अनेक भूखंड असून या भूखंडावर झोडपडपट्टी धारकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र मुंबईतील जागांची कमतरता लक्षात घेता म्हाडा अशा जागांवरील अतिक्रमण हटवून त्या भूखंडांचा विकास करणार आहे. हा विकास करत असताना आवश्यक तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात येईल.