मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) 'मेट्रो ३'च्या मार्गिकेतील भूमिगत स्थानकांवरील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानकातील मोकळ्या जागा संस्थांना, दुकानदारांना भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. भूमिगत मेट्रो स्थानकांमधील तब्बल १ लाख ९२ हजार चौरस फूट इतकी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे. यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
'कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३' मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू असून, आरे बीकेसी पहिला टप्पा मे अखेरपर्यंत प्रवासी सेवेत आणण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर बीकेसी-वरळी आणि वरळी-कुलाबा हे टप्पे सेवेत दाखल होतील.
भूमिगत मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर तिकीट विक्रीतून एमएमआरसीला महसूल मिळणार आहे. त्याशिवाय इतर माध्यमातूनही महसूल मिळविण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. त्यामुळेच एमएमआरसीने 'मेट्रो ३' मार्गिकेतील भूमिगत स्थानकांवरील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. स्थानकातील मोकळ्या जागा संस्थांना, दुकानदारांना भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. यासाठी एमएमआरसीने ८ एप्रिलपर्यंत विनंती प्रस्ताव मागविले आहेत.
भूमिगत मेट्रो स्थानकांमधील सुमारे १ लाख ९२ हजार चौरस फूट इतकी जागा भाडेतत्वावर दिली जाणार आहे. यामध्ये खाद्यपदार्थ, औषधे, फुले, खेळणी-भेटवस्तू, कपडे आदींची दुकाने, सुपरमार्केट, एटीएम आदींचा समावेश असणार आहेत. किरकोळ श्रेणीत अगदी सलूनपासून जिम, कोचिंग क्लासेस, माबोइल टॉप-अप स्टोअर्स, कुरिअर, व्हेडिंग मशीन आदींचा समावेश असणार आहे.