मुंबई (Mumbai) : वडाळा-घाटकोपर कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. सुमारे तीन वर्षांपासून रखडलेल्या ठाण्यातील मोघरपाडा येथील कारशेड जमिनीच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु असून, लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरु होणार आहे. हे काम पूर्ण होताच या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम सुरु आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे सुमारे 40 ते 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएने यापूर्वी ओवळा येथील एक भूखंड कारशेडसाठी आरक्षित केला होता. मात्र हा भूखंड व्यवहार्य नसल्याने मोघरपाडा येथील भूखंड निवडण्यात आला. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे येथे या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नव्हते.
अखेर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्याने या प्रकल्पातील एक अडथळा दूर झाला आहे.
कारशेडच्या भूखंडाचे सर्वेक्षण पूर्ण होताच भूसंपादनाची प्रक्रिया सुरु होणार आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण होताच कारशेडच्या कामाला सुरुवात होणार आहे.