Mumbai Metro Tendernama
मुंबई

Mumbai Metro-3 : स्टेशन परिसरात मल्टी मॉडल इंटिग्रेशन सुविधा उभारणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आरे, सीप्झ, मरोळ नाका आणि एमआयडीसी या चार स्थानकांच्या परिसरात मल्टी मॉडल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. एमएमआरसीकडून या स्थानकांच्या परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी ७ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन 'एमएमआरसी'ने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीकरिता टेंडर प्रसिद्ध केले आहे.

मेट्रो-३च्या मार्गिकेवरील स्थानकांच्या परिसरातील कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना सहजरीत्या पोहोचता यावे, याकरिता मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो स्थानकात प्रवासी बस, ऑटो रिक्षा, दुचाकी, खासगी वाहनाने किंवा पायी येतात. एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेले प्रवासी आणि विविध प्रकारांतील वाहनांमुळे मेट्रो स्थानकांच्या परिसरात कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच मेट्रो स्थानकाकडे पोहोचण्याचे पादचारी मार्ग, रस्त्यांना अतिक्रमणांचा वेढा पडलेला असतो. पदपथांची दुरवस्था झालेली असते. रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. यावर मार्ग काढण्यासाठी हा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार आहे. यातून स्थानकांच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. 'एमएमआरसी'ने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीकरिता टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या काही लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

मेट्रो स्थानक परिसरात चालणे सुलभ व्हावे, यासाठी मोठे पदपथ बांधले जाणार आहेत. बस, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने आदींसाठी नियोजित जागा, मेट्रो स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना गाडीतून उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी सुविधा, स्थानकांच्या परिसरात लेन मार्किंग, चिन्हे, बलार्ड, बाके, ई-टॉयलेट आदींचा विकास, जंक्शन सुधारणा आणि सिग्नल यंत्रणा उभारणे, माहिती फलकांची उभारणी, स्थानकांच्या परिसरातील सेवा वाहिन्यांची जागा बदलणे, बसण्यासाठी बाके, पथदिव्यांची उभारणी आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.